माझ्याविषयी

इतके दिवस हा टॅब रिकामाच ठेवला होता. 
कारणही तसंच होतं म्हणा. लौकिकार्थाने स्वत:बद्दल सांगावं असं काहीच नव्हतंच; आजही नाहीये. पण परवाच आकाशवाणीवार १०० व्या कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग केलं, तेव्हा लक्षात आलं की गेल्या सात वर्षात अमेय बाळ या नावामागे बर्‍याच चांगल्या गोष्टी जोडल्या गेल्येत. वयच्या १८ व्या वर्षापासून ‘युववाणीसाठी’ कार्यक्रम करता करता निवेदक आणि लेखक म्हणून इतकी प्रगती झाली की आज २०० निवेदनाचे कार्यक्रम नावामागे आहेत. भरीला भर म्हणून याच दरम्यान संवादिनीशी नातं जोडलं गेलं आणि जीवाभावाचा मित्र अमेय गावंड याच्याबरोबर मंदिरांमध्ये संतवाणीला साथ करू लागलो. अर्थात हे सगळं करत करता पोटापाण्याची सोय करायला हवीच होती. पत्रकारिता करायची हे स्वप्न मनाशी धरून सुरू केलेला प्रवास एक अनपेक्षित वळणावर येऊन पोहोचला. ‘अट्टल बॅकबेंचरला’ ‘लेक्चरर’ व्हायची संधी मिळाली आणि तिथून मग मागे वळून पाहायचं नाही असं ठरवलं. वयाच्या २० व्या वर्षी लेक्चरर झालो आणि आज वयाच्या २५ व्या वर्षी लेक्चररशिप चा पाच वर्षाचा अनुभव आहे. दरम्यानच्या काळात ‘चिन्ह’ या चित्रकलाविषयक नियतकालिकात सहाय्यक संपादक म्हणून काम केलं (ब्लॉग कसा लिहायचा हे तिथेच समजलं), माजी महापौर अशोक वैती यांच्या एका पुस्तकाचं शब्दांकन केलं, दोन संस्थांसाठी माध्यम समन्वयक म्हणून काम केलं. त्यामुळे गेल्या आठ वर्षात बर्‍याच ठिकाणी फिरून आलोय. म्हणजे आता खर्‍या अर्थानी यशाचा मर्गावर चालण्यास समर्थ झालोय असं म्हणायला हरकत नाही.