लेखमाला



दिसामाजी काहीतरी लिहावे….

ज खूप दिवस झाले काहीतरी लिहावं असं सारखं मनात येत होतं; पण काय लिहावं?, कसं लिहावं? हे ठरत नव्हतं. खरंतर आत्ताही जे लिहिणारे ते कितपत आणि कसं होणारे ते मलाही माहित नाही. पण समर्थांनी म्हटलंच आहे “दिसामाजी काहीतरी लिहावे… परी अखंडित वाचीत जावे॥” आता ह्यातलं अखंडित वाचणं झालं तर मग कशाला काय हवंय? तरी असो, ‘काहीतरी लिहावे’ याजसाठी हा सारा अट्टहास!


आजचा विषय तसा रोजचाच, तुमच्या आमच्या अगदी जवळचा, आपल्या तरूणाईचा! तंत्रज्ञानामुळे हल्ली आपली खूप चांगली सोय झाल्ये. इंटरनेटमुळे आपण एकमेकांच्या जवळ तर आलोच आहोत; पण फेसबुक, ऑर्कुटमुळे एकमेकांशी घरबसल्या गप्पा मारणं, जुन्या मित्रांना शोधणं हे फार सहज सुलभ झालंय. मलासुद्धा फेसबुकचं व्यसन लागलंय. मित्रांच्या यादीत साडेपाचशेपेक्षा जास्त मित्रा आहेत, त्यातले रोज तीसएक मित्र  गप्पा मारायला असतात. तास दोन तास कसे जातात कळतच नाही. खरंच हे पाहून “तंत्रज्ञानाच्या नावानी चांगभलं” असंच म्हणावंसं वाटतं.

हे सगळं एकीकडे होत असताना ह्याच ऑर्कुट आणि फेसबुकमुळे आपण फारच ‘घरकोंबडे’ (‘होमसिक’) झालोय मित्रांशी ‘चॅटिंग’ करता करता कट्टे ओस पडताना दिसताहेत. ज्या कट्ट्यांवर बसून आपण मजा करायचो तिथे कधीतरी एखाददा आपण जिवंत असण्याची नोंद देण्यापुरेसे जातो. फेसबुकीरूपी आभासी कट्ट्यांमुळे जगातल्या कुठल्याही टोकाच्या माणसाशी, मित्राशी आपण गप्पा मारू शकत असलो; आपल्यातलं अंतर कमी झालं असलं; आपण जवळ आलो असलो तरी प्रत्यक्षात आपण खूपच दुरावलो आहोत. आभासी रूपानं (virtually)  आपण एकत्र आलोय पण प्रत्यक्षात एकमेकांपासून खूप दुरावलोय.
मित्राला शीळ घालून किंवा ‘ए रव्या’, ‘ए जोश्या’, ‘ए पिंट्या’ अशी आरोळी ठोकण्यातली मजा कुठे गेली? भारतानी सामना जिंकल्यानंतर आपण बॅट – बॉल घेऊन खेळण्यातली मजा ‘Cricket 2007’ मध्ये आहे? त्यानंतर कट्ट्यावर बसून एरियातल्या मुलींकडे बघण्यात जी मजा आहे ती फेसबुक वरच्या प्रोफाईल बघण्यात आहे? एखाद्या रविवारी मित्रांबरोबर टाईमपास करायला बाईकवरून किंवा सायकल वरून निघण्यातली मजा फार्मव्हिला खेळण्यात आहे?

खरंतर आता तुम्हाला वाटेल काय बोर करतोय. तुमचही खरं आहे कारण कालप्रवाहाप्रमाणे जाणं यातंच तथ्य आहे. भविष्यातले हेच कट्टे आहेत. पण एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे की फुलबाजी कितीही चमचमली, तडतडली तरी ती विझली की राहतो मिट्ट काळोख! पण नंदादीप हा जरी मंद प्रकाश देत असला तरी तो चिरंतन टिकणारा आहे. आता तुम्हीच ठरवा काय निवडायचं!!!

                                                                                    -- अमेय बाळ.  









पहाट...




आज आपुल्या प्रितीची पुन्हा चाहूल लागली
रात्र सरली तमाची सखे पहाट फुटली॥धृ॥

सोसलेले शाप होते
भोगलेले दु:ख होते
पण आपल्या मनाचे
भाव नि:ष्पाप होते

रंग गंधात न्हाऊन आज प्रभा उजळली 
रात्र सरली तमाची सखे पहाट फुटली॥१॥

डाव नियतीचा होता
घाव तिनेच घातला
पण रेशीमबंध हा
नाही कधीच तुटला

माझे श्वास होऊनिया तुझी तान नि:श्वासली
रात्र सरली तमाची सखे पहाट फुटली॥२॥