
नांदी एका सुवर्णाध्यायाची
दिवस उजाडे, दिवस मावळे
कालचक्र हे सदाच चाले
भूत भविष्याच्यामधूनी
वर्तमान डोकावे
असाच तो दिन आला
जयघोषाच्या स्वरात न्हाला
पुन्हा एकदा इतिहास रचूनी
धन्य धन्य तो सुदिन झाला
उत्कंठेची भरली घटिका
नसानसात उर्मी भिनली
मातृभूमीचे ऋण फेडाया
पराक्रमाची रीघ लागली.
अथांग सागर दोन्हीबाजूस
लहरत, गर्जत, उसळत होता
प्रत्येकाच्या मनामनांत
विजयाचा ध्वज फडकत होता
रणकंदन ते सुरू जाहले
नाण्याचे दान उलटे पडले
भेदक अस्त्रे होती म्हणूनी
प्रतिपक्षाला जखडून ठेवले
सारे काही सुरळित होते
प्रतिपक्षाला सुधरत नव्हते
हल्ले त्यांचे बोथट झाले
चक्रव्यूह उमगत नव्हते
अशाच वेळी सेनापतीने
मेघगर्जना केली
अन् ‘जय’वर्धनाची स्वप्ने
प्रफुल्लित केली
जखडून ठेवल्या बेड्यांचा
त्याने समाचार घेतला
डाव आपला रचलेला
आपल्यावर उलटवला
चौफेर त्याची फटकेबाजी
धावांच्या धारा बरसती
सगळे रणधीर, धुरंधर
कुंठित त्यांची मती
आता वेळ आपली होती
चोख प्रत्युत्तर देण्याची
एक नवा इतिहास
रचण्याची
आता प्रतिपक्षाचे हल्ले
आपणास परतवायचे होते
अशाचवेळी प्रधान सैनिक
माघारी परतून गेले
तरीही शंकाकुषंका नव्हती
सेनापती खंबीर उभा हा
पण काळाचा घात तयासही
नाही सावरता आला
आता मात्र सगळे शांत
नि:शब्द अन् नि:स्तब्ध
विजयाची स्वप्ने बहुतेक
झाली आता उद्ध्वस्त
पण संयमी, शांत अन्
‘गंभीर’ खेळला
विराट देखील खारीचा
वाटा देऊन गेला
त्यानंतर कर्णाधाराने
थंडपणे हल्ला केला
’गंभीर’ खेळ संपून जाता
‘धोनी’पछाड आरंभला
आता मात्र विजश्रीच्या
लाटा उसळत होत्या.
प्रेक्षकांच्या डोळ्यादेखत
इतिहास रचणार होता
अखेर राजाचा एक तडाखा
अन् तो क्षण समीप आला
विजश्रीचा ‘षटकार’ खेचून
लंकेचा वाजविला डंका
असीम पराक्रम करून
घनगंभीर नाद गुंजला
विश्वविजेते म्हणून
विश्वचषक जिंकला
एकच जल्लोष,
एकच उल्हास
विश्वचषकाची भेट
कोट्यवधी जनतेस
क्रिकेटच्या देवाचे
स्वप्नपूर्ण झाले
इतिहासाच्या ग्रंथात सुवर्णाध्यायाचे
एक नवे पर्व सुरू जाहले.
No comments:
Post a Comment