24 April, 2011

प्रतिकूल तेच घडेल आणि अनुकूल ते घडवावं लागेल”

नमस्कार मित्रांनो,

खरंतर माफ करा! मोठ्या हिरीरीनं ब्लॉग सुरू केला पण त्यावर रोजच्या रोज पोस्ट टाकणं शक्य होत नाहीये. एका बाजूला एम. ए. च्या संशोधनाचं काम दुप्पट वेगाने सुरू आहे आणि दुसरीकडे मनात विचारांची एव्हढी रीघ लागल्ये की आता मनातल्या प्रत्येक विचाराला ‘आप कतार में हैं।’ असं सांगावं लागतं. शेवटी आज न राहून मनातल्या विचारांना वाट करू द्यायचं ठरवलंच! मागच्या माझ्या लेखात मी आभासी जग आणि वास्तव जग यांच्यात आपण कुठे आहोत याचा सारांश दिला होता. पण आजचा विषय थोडा वेगळा आहे आणि कदाचित किचकटही!

सध्या मी स्वातंत्रवीर सावरकरांचं “माझी जन्मठेप” चरित्र वाचत आहे. पुस्तकाची फक्त १२९ पानंच वाचून झाल्येत (एकूण पानं ५२३) पण या पहिल्या काही पानांतच मनातले विचार अक्षरश: ढवळून निघाले आहेत. १२९ पानावर सावरकर त्यांना झालेल्या आत्महत्येच्या मोहाविषयी वर्णन करतात. ते वर्णन वाचून आणित्यापुढील त्यांचा विवेकानं केलेला तर्कवाद वाचून मन थक्क होतं आणि एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली ती अशी की माणसाची सद्‍सद विवेक बुद्धी जागृत नसेल एक छोटीशी वार्‍याची झुळुक देखील प्रचंड मोठ्या आशावादी माणसास वा युद्धप्रसंगी एखादा कर्तबगार योद्ध्यास वावटळीप्रमाणे उद्‍ध्वस्त करू शकते.

पण मला ज्या विषयावर बोलायचंय तो विषय आहे स्वातंत्र्यवीरांच्या आशावादाबद्दलचा आणि त्यांचा आशावाद हा दैववाद नाही हे आधीच स्पष्ट करतो. म्हणजे आपण नेहमी काही वाईट झालं की म्हणतो “देव करतो ते भल्याकरता. यातून काहीतरी चांगलंच होईल” जगाच्या इतिहासात आजतागायत कुणालाही सुनावली गेली नाही एकमेव मोठी आणि कठोर शिक्षा सावरकरांना घोषित झाली. ५० वर्षं काळ्यापाण्याची शिक्षा. एखादा असता तर हे ऐकून त्याची बोबडीच वळली असती किंवा एकदम हार्ट अ‍ॅटॅक; पण सावरकर मात्र एखाद्या अचल पर्वतासारखे खंबीर होऊन उभे होते. तुम्ही म्हणाल मुद्दाचं काय ते बोल; उगाच कीर्तन लावू नको. पण ही पार्श्वभूमी सांगणं आवश्यक आहे. कारण हे माहित नसेल तर त्यांच्या आशावादातला सद्‍सद विवेक आणि आपल्या (तथाकथित) आशावादातला खुळचटपणा, ओंगवाणेपणा यातला फरक कळणार नाही.

अशा भीषण परिस्थितीत जेथे भल्याभल्यांचे आत्मनिग्रह मोडून त्यांना मरण प्रिय वाटले असते तेथे सावरकर “माझी जन्मठेप”च्या पहिल्याच काही पानांत त्यांच्या विवेकी आशावादीची ओळख पटवून देतात आणि त्या आशावादाची जाणीव करून देणारं एकच विधान ते म्हणजे “प्रतिकूल तेच घडेल आणि अनुकूल ते घडवावं लागेल”

काय ताकद आहे या एका विधानात! सहस्रादी भास्करांचं तेज आणि कोट्यवधी शूरांची ऊर्जा ओतप्रोत भरून वाहते आहे. हे विधान वाचल्यापासून मनातील विचार, त्यातील नकारात्म भाव, दु:ख, दाह, क्लेश यांची एकहाती हकालपट्टी झाली आणि रोजच्या व्यवहारात कसपटासमान गोष्टींना आपण किती अवास्तव महत्त्व देतो आणि अकारण त्यांचा किती बाऊ करतो याची एका क्षाणात जाणीव होऊन आपण जगत असलेल्या जीवनाचा तिटकारा नव्हे तर कीव वाटू लागली.

आता राहता राहिला प्रश्न तो आशावादाचा! हा आशावाद जो वरील विधानात दिसतो त्याला कर्मयोगाची आणि प्रयत्नवादाची किनार आहे; पण आपल्या आशावादाला भोळ्या भाबड्या भावातून निर्माण झालेल्या खुळचट कल्पनाविलासाची जोड असते. त्यामुळेच आपण सगळ्या गोष्टी नशीबावर सोपवून मोकळ्या होतो. “माझ्या नशीबात नाही” असं म्हणून प्रयत्न सोडून देण्याची आपली सवय तिथलीच! सावकरांच्या वाक्यातली अनुकूल घडवण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती ही खरोखरंच एखाद्या योद्ध्यासारखीच आहे. नाहीतर आपण आहे त्या परिस्थितीत परिस्थितीचे गुलाम होऊन बसतो आणि मग म्हणतो “आयुष्य म्हणजे एक तडजोड आहे” का? इंग्रजीत खूप चांगलं वाक्य आहे “It is always better to negotiate than adjust with life!” आपण तडजोड या शब्दाचा किती विपर्यास केलाय हे यावरूनच लक्षात येतं.

असो बोलायचं खूप आहे, लिहायचं खूप आहे पण मर्यादा पाळणंही तित्कंच गरजेचं आहे. त्यामुळे एवढंच म्हणीन की कर्मयोगी आशावाद ठेवावा नाहीतर नशीबातल्या गोष्टीही हातातून निसटतील.

--- अमेय सु. बाळ.





2 comments:

  1. chhan lihilays....keep reading janmathep.....much more to come....

    ReplyDelete
  2. http://www.youtube.com/watch?v=wZUJ6x6oYAg

    See this video..Its optimism which gives you great strength. :)

    ReplyDelete