नमस्कार मंडळी,
कालपासून आपणा सर्वांच्या मनात एकीकडे आनंद, आश्चर्य तर दुसरीकडे विस्मय, शंका अशा संमिश्र भावना उमटल्या असतील. स्वाभाविक आहे ते पण अमेरिकेत मात्र फक्त जल्लोषाचं वातावरण आहे. दिवाळी साजरी होत्ये तिकडे. अहो होणारच! दहशतवादाचा सम्राट (अमेरिकेच्या मते) ओसामा बिन लादेन ठार झाला (ठार केला). ज्या लादेननं २००१ साली अमेरिकेवर दहशतवादी हल्ला केला तो क्रूरकर्मा अखेर संपला.कालपासून प्रत्येक वृत्तवाहिनीवर ‘दहशवादाचा सूत्रधार संपला!’, ‘क्रूरकर्मा ठार’ अशा मथळ्याच्या बातम्या प्रदर्शित होत होत्या.
पण खरोखरच लादेन संपला? का त्याला संपवला? मला जरा वेगळीच शंका येत्ये. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मा. बराक ओबामा यांनी आपल्या वक्तव्यात उल्लेख केला की, “आमचा लढा हा इस्लाम विरूद्ध नाही तर ‘अल् कायदा’ विरूद्ध आहे.” या विधानाचा नीट विचार केला तर ओबामा यांचा सावध पवित्रा लक्षात येतो. ओबामा यांनी शब्द फार जपून वापरलेत कारण त्यांनी असं म्हटलं की “आमचा लढा हा इस्लाम विरूद्ध नाही तर ‘अल् कायदा’ विरूद्ध आहे.” यात त्यांनी फक्त ‘अल् कायदा’ या अतिरेकी संघटनेचाच उल्लेख केला. मग ‘लष्कर – ए – तोय्यब्बा’, ‘जैश – ए – मोहम्मद’ या दहशवादी संघटनांना अमेरिकेनी क्लिन चीट दिला असं समजायचं का? काही महिन्यांपूर्वीच ‘अमेरिका नेहमीच दहशदवादाविरूद्ध लढत राहिल’ असं म्हणणार्या ओबामासाहेबांना मला असं विचारायचंय की फक्त ‘अल् कायदा’ हीच एकमेव अतिरेकी संघटना जगात आहे का? तसं असेल तर ‘लष्कर – ए – तोय्यब्बा’, ‘जैश – ए – मोहम्मद’ या संघटना लहान मुलांना लिमलेटच्या गोळ्या वाटतात का रामदेवबाबांप्रमाणे विश्वशांती आणि योग साधनेची शिकवण देत फिरतात? असं असूनही ओबामांचं असं (धूर्तपणे) विधान म्हणजे नेमकं काय हे वेगळं सांगायला नको.
प्रत्यक्षात सरळ आणि स्पष्ट बोलायचं तर अमेरिका म्हणजे दहशतवादावर वाढणारं बांडगुळ आहे आणि हे सगळ्या जगाला माहित्ये. त्यामुळे अमेरिका कितीही म्हणाली की आम्ही दहशतवादाला विरोध करतो तरी ते किती गंभीरपणे घ्यायचं हे आपणच ठरवावं आणि दहशतवाद संपला तर अमेरिकेत तयार होणारी शस्त्रास्त्र कोण वापरणार आणि मग अमेरिकीची आर्थिक महासत्ता म्हणून असलेली ओळख कशी टिकून राहणार.
२००१च्या हल्ल्यानंतर आपणच पोसलेलं आपलं अनवरस अपत्य आता आपल्याच पेकाटात लाथ घालतय हे अमेरिकेच्या लक्षात आलं आणि त्यानंतर लादेनच्या नावाखाली अमेरिकेनं अफगाणिस्तान उद्ध्वस्त करून आपला हेतू साधून घेतला आणि आता गरज संपल्यावर ‘गरज सरो आणि वैद्य मरो’ ह्या उक्तीला धरून त्यांनी ओसामालाही संपवलं. पण हे सगळं इतक्या सफाईनं केलं की आपण किती सच्च्या मनानं दहशतवादाशी लढतोय! पण मांजर डोळे मिटून दूध पित असली तरी सगळं जग ते ‘डोळस’पणे पाहत असतं. आपल्याला आठवत असेल तर दोन्ही महायुद्धांच्याकाळात अमेरिकेच्या भूमीवर युद्ध झालंच नाही आणि त्यामुळे अमेरिका ही आर्थिकदृष्ट्या नेहमीच सबळ राहिली. त्यादरम्यानच ‘शस्त्रास्त्रांचा आमचा धंदा’ हा ब्रीदाला अनुसरून अमेरिका सर्व दहशतवादी राष्ट्रांना शस्त्रास्त्र पुरवत राहिली. म्हणूनच ओबामा असं म्हणाले की “आमचा लढा ‘अल् कायदाशी आहे(दहशतवदाशी नाही)”
तेव्हा आता आपणंच ठरवायचंय की अमेरिकेनं काल जो पराक्रम केला (निदान तसं दाखवलं तरी), त्यात कोणाचा आणि किती फायदा आहे! पण एवढं मात्र नक्की की ओबामा काहीही म्हणाले तरी त्यांच्या मनात ‘तेरे बिना (लादेन) जिया जाए ना!’ हेच येत असेल.
आकर्षक मथळा! Interesting title ;)
ReplyDelete