
आपली माणसं...
आपल्या आजूबाजूला अनेक माणसं असतात॥
कुणी हसतात, कुणी रडतात,
कुणी उगाचच बघत बसतात.
कुणी नाचतात, कुणी बागडतात
तर कुणी नुसतीच ये - जा करतात.
कुणी पडतात, कुणी उठतात;
तर कुणी सतत ‘धड’पडत असतात.
आपल्या आजूबाजूला अनेक माणसं असतात॥
कुणी लिहितात, कुणी वाचतात;
तर कुणी नुसताच विषय होऊन बसतात.
कुणी मालक असतात, कुणी नोकर असतात;
तर कुणी वेठीला जुंपलेले चाकर असतात.
कुणी राजे असतात, कुणी वजीर असतात;
तर कुणी आपापल्या सवयीचे गुलाम असतात.
आपल्या आजूबाजूला अनेक माणसं असतात॥
कुणी रात्री जागतात, कुणी दिवसा झोपतात
तर कुणी रात्रंदिवस नुसती कुढत असतात.
कुणी प्रेम करतात, कुणी तिरस्कार करतात
तर कुणी सुवर्णमध्य म्हणून लग्न करून बसतात.
अशी अनेक माणसं आपल्याला रोज भेटत असतात
आपला डोळा चुकवून गर्दीत नाहीशी होतात
पण जाता जाता ‘कशासाठी जगायचं?’ ते मात्र शिकवून जातात
आपल्या आजूबाजूला अनेक माणसं असतात.....
--- अमेय बाळ.
No comments:
Post a Comment