जीवनगाणे . . . !
नमस्कार मित्रांनो,
आज खूप दिवसांनी पुन्हा लिहायला असं काहीतरी मिळालं. म्हणजे
एरव्ही मिळत नव्हतं असं नाही, पण आज आळस बाजूला करून लिहावंसं वाटलं. खरं तर मी जे
काही सांगणार आहे ते अचानक मनात आलेले विचार आहेत पण तरीही त्यांना शब्दबद्ध करण्याचा
हा प्रयत्न.
मित्रहो आपण रोज अनेक गोष्टींचा
वापर आपल्या सोयीसाठी करत असतो. म्हणजे मोबाईल, पेन, पाकीट, लॅपटॉप बॅग वगैरे
वगैरे त्यातलीच एक पण अतिशय साधारण गोष्ट म्हणजे चप्पल! पण आपण कधी विचार केलाय की या चप्पलेची
सुद्धा अनेक रूपं असू शकतात. म्हणजे बघा हं, आपण पायात घातल्या तर ‘चप्पला’,
एखाद्या खेड्यातल्या माणसानं घातल्या तर त्या ‘वहाणा’ होतात;
एखाद्याला चोप द्यायला उगारल्या तर ‘पायताण’ होतात; एखाद्या संत
महंतानं पायात धारण केल्या तर त्यांच्या ‘पादुका’ होतात आणि मुलीच्या बापनं तिच्या लग्नासाठी
झिजवल्या तर त्यांचे ‘जोडे’ होतात. वस्तू तीच पण तिच्या वापरानुसार आणि
त्यामागच्या भाव-भावनांच्याप्रमाणे त्या वस्तूचं नाव आणि दर्जा बदलतो, ठरतो.
आणखी एक उदाहरण देतो. ‘वरात’
हा शब्द आपल्याला परिचित आहेच. समजा ती एखाद्या राष्ट्रपुरूषाची असेल तर ती ‘मिरवणूक’
होते; तीच वरात जर गाढवावरून काढली तर तिची ‘धिंड’ होते; तीच जर
शोषित वर्गानी आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी काढली तर त्याचा ‘मोर्चा’
होतो आणि तीच जर आयुष्याच्या शेवटच्या क्षणी निघाली तर ‘अंतयात्रा’
होते.
गोंधलात ना की मला नेमकं काय
म्हणायचंय! सांगतो वर जी उदाहरणं दिली ती तसंच आपलं आयुष्य आसतं. जर स्वत:साठी
जगलो तर ते ‘जगणं’ होतं;
इतरांसाठी वेचलं ‘जीवन’ होतं; सतत कुंथत काढलं तर ते रोजचंच ‘मरण’ होतं; विलासी आणि सुखासीन जगलो तर क्षणभराची
मौज आणि रोजची ‘मौत’ होते
आणि समाधानात सुख मानून आणि कटूगोड आठवणींच्यासाथीनं जगलो तर ‘जीवनगाणं’ होतं.
तेव्हा अस्तित्वात राहणं सोडा
आणि जगायला शिका! पाडगावकरांनी खूप छान म्हणून ठेवलंय,
“अंधारात कुढायचं की प्रकाशात
उडायचं,
तुम्हीच ठरवा , सांगा कसं जगायचं?”
तुम्हीच ठरवा , सांगा कसं जगायचं?”
No comments:
Post a Comment