सांगायचं बरंच आहे, पण .
. .
नमस्कार,
आज परत खूप दिवसांनी काहीतरी लिहावंसं वाटतंय. नेहमीप्रमाणे
आजचा विषयही वेगळाच आहे. पण नेहमीपेक्षा जरा जास्त गंभीर आहे. आज पहिल्यांदा मी एका
शिक्षकाच्या भूमिकेतून लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे. तसं म्हटलं तर गेला एक महिना
मनात विचारांचं जाळं पसरतलं होतं; पण त्यात खूप गुंतागुंत होती, आज शांतपणे तो
सगळा गुंता सोडवला आणि शक्य तितक्या प्रामाणिकपणे तुमच्यासमोर मांडण्याचा हा
छोटासा प्रयत्न करतोय!
माझ्या सर्व गुणी विद्यार्थी मित्रांना आणि त्यांच्या
पालकांना माझा नमस्कार! सप्टेंबर महिना म्हणजे सर्व महाविद्यालयीन मुलांसाठी
थोडासा टेन्शन आणि ताणतणावाचाच! ‘प्रोजेक्ट’, ‘प्रॅक्टीकल्स’, ‘क्लासटेस्टस्’ आणि
‘सबमिशन्सचा’, त्यामुळे सगळीकडेच ‘प्रिंट आउट्स’, ‘फोटोकॉपी’ ची धावपळ चालू असते.
सगळ्यांच्याच कपाळावर सतत आठ्या दिसतात. सहाजिकच आहे म्हणा, मार्क ‘कमवण्याचं’
केवढं टेन्शन असतं त्यांना. हो, बरोबर वाचलंत तुम्ही मार्क ‘कमवण्याचं’च टेन्शन
असतं. ज्याप्रमाणे रोज आठ – दहा तास घराबाहेर राहून, जीवाचं रान करून नोकरदार वर्ग
संसार चालवण्यासाठी पैसा कमावतो, त्याचप्रमाणे आज प्रत्येक विद्यार्थी हा मार्क
कमवण्याच्याच मागे लागलेला दिसतो. कारण जीवघेणी स्पर्धा, पालकांचा पहिलं
येण्यासाठी तगादा आणि मार्क हेच सर्वस्व ही मानसिकता!
पण हा आजचा विषय नाही आणि या संबंधी अनेकदा बोलूनही झालंय.
आजचा विषय म्हणजे या सगळ्यातून विद्यार्थ्यांची उमटणारी प्रतिक्रिया आणि त्यांचं
त्यामागचं विवेचन. गेल्या महिन्याभरात मी दोन वेगवेगळ्या महाविद्यालयातल्या तीन ‘डिव्हीजनच्या’
विद्यार्थ्यांचे क्लासटेस्टचे पेपर आणि प्रोजेक्ट तपासले. त्यात “तुम्ही दिलेले
विषय ‘इंटरेस्टींग’ होते म्हणून मजा आली” अशी अनेकांची प्रतिक्रिया होती, पण
सगळ्यांमध्ये एका गोष्टीत साधर्म्य जाणवलं ते म्हणजे “सर, इंटरनेटवरून माहिती
काढून ३० – ३५ पानांचं प्रोजेक्ट करायला देऊ नका. काहीतरी ‘perform’ करायला सांगा किंवा ‘present’
करायला सांगा. एकतर कॉलेजमध्ये काहीच फेस्टीवल होत
नाहीत, आम्हाला आमचे कलागुण सादर करायला ‘प्लॅटफॉर्म’ मिळत नाही. त्यामुळे कॉलेजही
नको वाटतं” अशी आलेली विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया! या वाक्याचा काय अर्थ काढायचा
हेच आधी समजत नव्हतं. म्हणून मी त्यांनाच प्रतिप्रश्न केला की ‘असं का?’ त्यावर
विद्यार्थ्यांचं उत्तर विशेषत: ‘mass media’ च्या विद्यार्थ्यांचं उत्तर मनात अनेक प्रश्न उभं करणारं होतं. ते म्हणाले,
‘सर, शाळेत असताना मी कविता लिहायचो, मी अभिनय करायचे, निवेदन करायचे; पण नववी
पासून सगळंच सुटलं, उरली ती फक्त खर्डेघाशी!’
त्यानंतर खूप वेळ त्यांच्याशी
बोलल्यानंतर असा मतितार्थ काढला की एखादी संकल्पना समजून घेण्यापेक्षा; पुस्तकातून,
गाईड मधून पाठ करायचं आणि लिहायचं यावर जास्त भर होता. त्यामुळे या ‘copy – pasting’ प्रकाराला मुलं कंटाळलेली दिसली. एकीकडे असं तर
दुसरीकडे क्लासटेस्टच्या पेपरमध्ये अर्ध्याहून जास्त मुलांनी पेपर अर्धवट किंवा
पूर्ण कोरे सोडलेले होते. त्याबाबत त्यांना विचारलं तर ‘सर तुम्ही सांगता ते सगळं
समजंत पण स्वत:च्या शब्दात व्यक्त करता येत नाही’ असं उत्तर आलं. त्यावर मी
म्हणालो, ‘‘उगाच पळवाटा शोधू नका, तुम्हाला हल्ली अवांतर वाचायला नको काही, तर मग
कशी भाषा सुधारणार आणि विचार करणार.” यावर जे त्यांनी उत्तर दिलं ते ऐकून कानात
शिशाचा रस ओतल्यासारखं वाटलं. ते म्हणाले, “सर, अवांतर वाचन म्हणजे काय हो?
आम्हाला तर फक्त गाईडमधली उत्तरं आणि क्लासेसच्या नोट्स वाचायचं असतं एवढंचं
माहिती आहे. हा, म्हणजे टाईमपास म्हणून आम्ही ‘कॉमिक्स’ वाचयचो पण इतर पुस्तकांशी
कधी संबंधच आला नाही’’
मित्रांनो आता आणखी काय बोलू? आणि
काय लिहू? एका शिक्षकानी Business Communication विषयाच्या मुलांना प्रकल्प म्हणून काय द्यावं तर जुन्या इंग्रजी कादंबरीचं
वाचन करून त्यावर परीक्षण लिहा. मला ते चुकीचे आहेत असं अजिबात म्हणायचं नाही; पण Business Communication साठी त्या मुलांचं व्यावसायिक
इंग्रजी सुधारणं आवश्यक असताना, जिथे त्यांचं व्यावहारिक इंग्रजी किंवा कुठलीच
व्यावहारिक भाषा सुधारलेली नसताना त्यांना जुन्या इंग्रजीतलं काय षश्प कळणारे!
आता नाही लिहवंत यापुढे. सर्व
पालकांना एवढंच सांगावंसं वाटतं की मुलांना अस्तित्वात राहायला शिकवण्यापेक्षा
जगायला शिकवा. कळपानी एकामागे एक जाणार्या मेंढरांपेक्षा त्यांना ‘सर्वाहूनी
निराळा राजहंस’ कसा होईल हे पहा. मला याची पूर्ण कल्पना आहे की वास्तवात हे सगळं उतरवणं
कठीण आहे पण अशक्य नाहीये. शिक्षकांना ही नम्र विनंती की विद्यार्थ्याला मार्क मिळवणारी
फॅक्टरी बनवण्यापेक्षा एक अख्खी ‘इंडस्ट्री’ उभारणारं व्यक्तिमत्त्व घडवा. मी
माझ्यापरीने तो प्रयत्न सुरू केलाच आहे, तुम्हीही यात सामील व्हाल अशी आशा बाळगतो.
धन्यवाद!
खूप सुंदर बरेच दिवसांनी पण नेहमी प्रमाणे चोख....:)
ReplyDeleteमस्त आवडलं
Seriously! Students la shiknya peksha.. jagayla shikayla hava!!
ReplyDeletewell written..
ture
ReplyDeleteThanks bhagyashree.
Deletewlcome sir
Delete