03 April, 2013


एक दिवस अचानक . . .

एक दिवस अचानक एक आगळीक घडली,
कट्ट्यावरती आली ती थेट मला भिडली।

मला बोलू न देता बडबड तिची सुरू झाली,
कट्ट्यावरती पोरांसमोर मान खाली गेली।

बडबड करत होती, डोकं माझं खात होती,
तरीदेखील घडी हाताची तोंडावरती बोटं होती।

नाजूक डोळ्यामध्ये तिच्या केवढी दहशत होती,
हळूच लक्षात आलं माझ्या गालवरती खळी होती।

सगळं बोलून झाल्यावर मोठ्या ऐटीत निघून गेली,
“याद राख, खबरदार”, जाता जाता सांगून गेली।

वणव्यासारखी ही बातमी कॉलेजभर पसरली,
आपली इमेज शेअर्ससारखी एकदम खाली कोसळली।

सगळी मुलं फक्त तिच्याबद्दल बोलत होती,
काय बोलली असेल मला याची चौकशी सुरू होती।

घरी गेल्यावर सुद्धा सारखी तीच दिसत होती,
स्वप्नामध्ये देखील माझा पिछ्छा काही सोडत नव्हती।

दुसर्‍या दिवशी मित्रांनी चांगलीच हजेरी घेतली,
‘काय म्हणाली ते सांग’ एकच रड लावली।

“कोण समजतोस स्वत:ला, हिम्मत तुझी कशी झाली?
प्रेम नाकारतोस माझं, किंमत माझी हीच केली?”

तुझी चांगली मैत्रिण होते, प्रेम करायला तू शिकवलंस,
तुझी साथ द्यावी मी, स्वप्न मनात जागवलंस।

तुझ्याशिवाय आता कोणी, या मनात जपणार नाही,
तुझ्याशिवाय कोणाशी, आता नातं जोडणार नाही।

हे ऐकून मित्रांनी माझी चांगलीच चंपी केली,
मूर्ख मूर्ख म्हणून माझी, कानउघडणी केली।

अरे वेड्या नशीबानं प्रेम असं स्वत:हून चालून येतं
अलगद कडेवर घेवून, मायेनं कुशीत घेतं।

सगळं माहित असून सुद्धा मी का नकार दिला होता,
माझ्या मनात रात्रंदिवस हाच प्रश्न घोळत होता।

या आधी आमचं एक प्रकरण कॉलेजभर गाजलं होतं,
थंड दूधानं असूनही तोंड माझं भाजलं होतं।

नको पुन्हा तो त्रास, नको होती कटकट साली,
सगळं सुंदर चाल्लय आता, नको नको ती पीडा झाली।

हे सगळं तिला कळलं तेव्हा पुन्हा समोर आली,
या वेळी गोड बोलून समजूत काढू लागली।

एक प्रयत्न फसला म्हणून कुणी कधी थांबत नसतं,
ते प्रेम फसलेलं ते कधीच प्रेम नसतं।

तिला म्हणालो या सगळ्या बोलायच्या गोष्टी आहेत,
नाही समजू शकणार कुणी माझं मन किती कष्टी आहे।

झटकन उठून हात धरून मिठी मारली मला
माझ्या प्रेमाचा यापेक्षा काय पुरावा देऊ तुला।

तिच्या गुलाबी ओठांवरती एक वादळ थांबलं होतं,
तिच्या नाजूक डोळ्यामध्ये सगळं आभाळ दाटलं होतं।

एक दिवस अचनक एक आगळीक घडली,
कट्ट्यावरती पुन्हा एक सुरेल प्रीत जडली।

-      अमेय सु. बाळ.

No comments:

Post a Comment