14 April, 2014








अंतरिक्षाचे प्रवासी

तानपुर्‍याचा नाद कानात आणि मनात झंकारतोय. मैफिलाचा समा बांधला गेलाय. साथीदारही तयार आहेत. रसिकांची उत्कंठा आता शिगेला पोहचले आणि अशावेळी सांध्यपर्वातील अस्ताला जाणार्‍या, तरीही तेजस्वी सूर्याच्या हुंकारातून निघालेला कोमल ऋषभ लावून मैफिलीचा नायक रसिकांच्या रसिकतेलाच आव्हान देतो. आपल्या प्रतिभेनी तो समोरच्याला अचंबितच करत नाही; तर थेट त्यांच्या अंतर्मनाचा वेध घेतो आणि मग ती मैफिल शब्द, सूर हे सर्व विसरून जाते; राहते ती फक्त अनुभूतीची लय आणि संवेदनांची दूर दूर पसरत जाणारी झांज. . .
ही मैफिल कोणा गायकाची नाही. . .  ती आहे आत्ममग्नतेतून चिरंतनाकडे नेणार्‍या एका संध्यासूक्तातील यात्रिकाची. . .
कवी ग्रेस यांची

नुकतंच कवी ग्रेस यांचं मितवा वाचून संपलं. आपल्यापैकी प्रत्येक वाचक जसा एका वाक्यापाशी शहारून थबकतो; तसाच मी ही थबकलो. “I must see my cradle & grave both hanging! हे ग्रेसचं सतत भूल पाडून विचार करायला लावणारं महावाक्यच! या एका वाक्यात ग्रेसच्या कवितांचा आशय, त्यांची व्याप्ती आणि त्यांचं मर्म दडलेलं दिसून आलं. एवढंच नव्हे तर हा कलंदर कवी मराठी कवितेला आशय, अलंकार, भावना इथपर्यंत मर्यादित न ठेवता तिला मानवी उत्पतीच्या आदिम काळापर्यंत नेतो; तिथेच न थांबता मानवी मनात साठलेल्या आदिम दु:खाच्या कळा शब्दबद्ध करून प्रत्येक कविता जणू या वेदनेचा हुंकार असल्यासारखीच वाटते.
म्हणूनच कवी ग्रेस यांचं लेखन आणि पं. कुमार गंधर्वांचं गाणं यांची तुलना करण्याचा मोह आवरत नाही. म्हणजे एकीकडे ग्रेस 

“माझं वय हे भूतकाळात, वर्तमानात, भविष्यात कुठेही बसत नाही. मी प्राचीन माणूस आहे, मी कायमच राहणार.” आणि नेमकी हीच प्रचिती कुमारांच्या निर्गुणी भजनात येते. “उड जाएगा हंस अकेला” असं सांगत कुमार देहभान विसरायला लावतात.

मराठी संत साहित्य, सूफी तत्वज्ञान, पाश्चात्य कवीपैकी काही महत्त्वाचे आणि हिंदी-उर्दूतले काव्य या सर्वांचे मंथन करून ग्रेस यांनी आपली विशिष्ट शैली केली. तर कुमारांनी सगळ्या घराण्यांच्या चीजा अर्जित करून, संतरचना आत्मसात करून, त्याला माळव्यातील लोकसंगीताची जोड देवून, त्यांना निसर्गदत्त निर्गुणी शैलीचा साज चढवून चिरंतनाकडचा प्रवास केला आणि सर्व रसिकांनाही त्याची अनूभूती दिली. अजून एक साम्य म्हणजे या दोघांनी कधीही आपली कलाकृती रसिकांनी समजून घ्यावी, त्याचा अर्थ लावावा असा अट्टहास कधीच केला नाही. त्यांची कलकृती म्हणजे जिवंतपणी मोक्षाची अनूभूती होती आणि आहे.

ग्रेस यांची कविता मानवी जन्माच्या आधीपासून त्याच्या मृत्युपर्यंत आणि त्यानंतरचाही वेध घेणारी; नेमकं सांगायचं तर सूक्ष्माकडून स्थूलाकडे आणि स्थूलाकडून पुन्हा सूक्ष्माकडे जाणारी होती आणि आहे; तसंच कुमारांचं गाणं देखील एखाद्या नाथपंथीयासारखं हातात चिमटा घेवून ‘अलख निरंजन’ म्हणत सगुणाकडून निर्गुणाकडे जाणारं होतं आणि आहे. ‘आहे’ म्हटलं कारण ग्रेसची कविता आणि कुमारांचं गाणं हे शरीर सोडून चराचरात विहार करणार्‍या अविनाशी आत्म्याप्रमाणे आहे.

शेवटी एवढंच म्हणीन की, निराकार, अमूर्त असलेल्या; ज्यात सर्व विश्व सामावलेले आहे, अशा अंतरिक्षाचे हे दोन प्रवासी! जे मानवी उत्पत्तीच्या आधीही होते आणि त्याच्या विनाशानंतरही असतील. 
- अमेय सु. बाळ

1 comment: