मारूबिहाग
१७०; नाही १८७
हो, बरोबर १८७! तरी पण अजून लक्षात येत नाही काय जादू आहे. म्हणजे साधारण अतिशय
मठ्ठातल्या मठ्ठ मुलाला सुद्धा १०० वेळा एखादी गोष्ट सांगितली तरी ती समजते; पण
माझी अवस्था त्याच्यापेक्षा हालाकीची झाली आहे. १८७ वेळा तीच गोष्ट पुन:पुन्हा समजून
घ्यायचा प्रयत्न केला, तरीही नाहीच समजलं. म्हणजे मठ्ठ या वर्गवारीच्या पुढेही
काहीतरी असतं हे तरी कळलं. म्हणूनच पुढे विचार करणं सोडून दिलं. नुसता जे येतंय,
ते काही घडतंय ते अनुभवत गेलो. हलकं वाटलं खूप, मोकळं सोडून दिलं स्वत:ला. जसा
प्रवाह वाहत होता तसा वाहत गेलो. मग हळूहळू लक्षात आलं की ज्या गोष्टीच्यामागे आपण
हात धूवून लागलो होतो. ती आता आपोआपच आपली वाटत्ये, हळूहळू आपल्या जवळ येवू
पाहत्ये, अं हं आपल्याला जवळ घेत्ये आणि एक क्षण असा आला मी माझा राहिलोच नाही.
ज्याचा ध्यास घेतला त्यानी मला, माझ्या मनला, माझ्या आयुष्याला व्यापून घेतलं
होतं. ती गोष्ट म्हणजे मारूबिहाग! होय, एकच रेकॉर्ड १८७ वेळा ऐकली, नाही कळला; कसा
कळणार म्हणा? कारण काही गोष्टींना भौतिक परिमाणांवर नाही मोजता येत ही अक्कलच
नव्हती. जसा त्या भौतिक परिघाबाहेर आलो, निव्वळ एक अनुभव म्हणून मारूबिहाग ऐकला
तेव्हा आपोआपच मी त्याचा झालो किंवा त्यांनी मला त्याचं करून घेतलं.
आजही
मारूबिहागाचे स्वर कुठूनही कानवर पडले की क्षणभर रेंगाळतो. पावलं थांबतात, मन
भारावून जातं. सगळ्या जगाचा विसर पडतो. खरंच नेणिवेतून अनुभवास येणारी ही जाणीव
अतिशय विलक्षण आणि निर्गुणाकडे नेणारी आहे.
कधी कधी विचार
येतो एक मारूबिहाग समजून घ्यायला १८७ वेळा ऐकावा लागला तरीही समजला नाही. मग
माझ्याकडे असलेल्या इतर १९९ चं काय करावं?
No comments:
Post a Comment