महोत्सव
आजपर्यंत उत्तर भारतात अनेक वेळा येणं झालं. इथल्या निसर्गाचे नवनवीन चमत्कार "याची देही याची डोळा" पाहिले. उबदार उन्हापासून हाडं गोठवणार्या थंडी पर्यंत; अगदी मुसळधार पाऊस सुद्धा! विशेषतः हिमालय हे उत्तर भारतातलं खास आकर्षण. इथला निसर्ग त्याची व्यवस्था ही इतकी सुंदर आहे की त्याच्या अचूक आणि काटेकोर पणाने मना थक्क होतं. दूरवर नजर जाईल तिथपर्यंत हिरवीगार वनराई आणि सरळ सोट पहाड; हो पहाडचं! आपल्याला तर नेहमीच निसर्गाच्या व्यवस्थेचं कुतूहल वाटतं. प्रत्येक गोष्टीत इतकी अचूकता कशी असू शकते याचं नवलच वाटतं. खरंतर आज सतरावी किंवा अठरावी ट्रिप असेल माझी, आणि आज हळूहळू लक्षात येतंय की नेमकी ही व्यवस्था चालते कशी. प्रतीकात्मक बोलायचं झालं तर ही व्यवस्था एखाद्या मैफिली सारखी आहे. या मैफिलीचा नायक हा इतका अचाट आणि भव्य आहे की ती ऐकण्यासाठी नव्हे ती अनुभवण्यासाठी सुरुवातीला खूप कष्ट पडतात. ही मैफिल म्हणजे आंदण नव्हे तुमच्या पदरात येऊन पडेल, खूप काही करावं लागतं या मैफिलीचा भाग होण्यासाठी! पण एकदा का तुम्ही आचाभाग झालात मग मात्र फक्त आनंद आणि समाधान!
मुळात आनंद आणि समाधान या शब्दांचा खरा अर्थ काय यासाठी या मैफिलीचा भाग व्हावंच लागतं. आता हा नायक हा इतका तरबेज आहे की सुरुवातीला तो आपल्या रसिकांची परीक्षा घेतो, या परीक्षेत उत्तीर्ण झालात तर तुम्हाला मैफिलीच्या प्रवेशद्वारात उभं राहता येत. परंतु थेट सभागृहात प्रवेश मिळवण्यासाठी, मैफिलीच्या नायकाला शरण जाण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. अलौकिक असा घंटानाद करून स्वतःच्या मनाला शांत करून आणि सर्व विशाद बाजूला ठेवून शरणागत भावनेन तुम्ही आलात तर मात्र हा नायक तुम्हाला अगदी आपलंसं करतो. मग हळू हळू हे मैफिल उलगडत जाते, सूर्योदय व्हावा तशी किंवा कळी उमलते तशी! निसर्गाच्या मैफिलीची स्वतः ची एक लय असते, आत्ममग्न आणि अलख! एखादी पारंपरिक बंदिश पुनः पुन्हा वेगवेगळ्या ढंगात आणि रंगात रंगत जाते. नव्याचा बाज आणि जुन्याचा साज अशा दुहेरी पटलावर ही मैफिल चालू असते. साथीदार म्हणून साक्षात शिवशंभू आपला खास पखवाज घेवून येतात.
असा हा हिमालयातला निसर्ग नेहमीच वेगवेगळी आव्हाने उभी करतो आणि आईच्या प्रेमळ मायेनी कुशीतही घेतो. यासगळ्यात मागे राहते संवेदनांची लय आणि अनुभूतीची दूर दूर पसरणारी झांज!
- अमेय सु. बाळ